ब्रह्मतल - एक अविस्मरणीय ट्रेक


पर्वतप्रेमी सर्व जनतेला खरं तर प्रत्येक ट्रेक हा अविस्मरणीयच , परंतु माझा हा ट्रेक का अविस्मरणीय हे तुम्हाला कळेलच .

ट्रेक की anniversary अशा अदभुत प्रश्नामधून (anniversary नाही हा फक्त पहिली anniversary ) सुरु झालेला हा ट्रेक पूर्ण होईल याची शाश्वती खरं तर ब्रह्मदेवालाही नसावी, भले त्याच्या नावाचा ट्रेक आहे तरी. परंतु माझी अर्धांगिनी ऋतुजा जिच्या संपूर्ण पाठबळावर हा ट्रेक मी खरं तर पूर्ण करू शकलो.

हिमालयीन ट्रेक हा एक उत्सवच जणू. Rucksack च्या खरेदीपासून अगदी extra न्यायच्या thermal पर्यंत प्रत्येक shopping ला ऋतुजानेच मदत केली. खरं तर जाण्याचा पहिला दिवस आणि माझ्या (sorry हं आमच्या) लग्नाची पहिली anniversary हा एकच दिवस. एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असा निरोप तिने मला दिला. आमच्या पहिल्या anniversary ला 'दोन ध्रुवावर दोघे आपण' च्या तऱ्हेने मी दिल्ली आणि ऋतु मुंबईच्या दिशेने निघालो.

आता सुरू होते खरी ट्रेकची मजा . सकाळचं 9.30 चं माझं flight prepone काय होतं आणि अगदीच miss व्हायच्या बेतात मी शेवटचा प्रवासी म्हणून काय जातो हे picture च्या story हुन कमी नव्हते. AI 649 या flight ने मग माझी ही स्वारी मजल दरमजल करत दिल्ली ला पोचली.

दिल्ली ही तशी मला नविन नाही , पण मेट्रोने सामान घेऊन प्रवास करायच्या इच्छेने खरंतर मी T3 ते सरोजिनी नगर हा प्रवास करत मी आमच्या  बँकेच्या  रेस्ट हाऊस ला पोचलो . त्याच  दिवशी रात्रीच्या राणिखेत एक्स्प्रेस ने मी काठगोदाम ला निघालो. पाठीवर भलेमोठे 14 किलो, छोटा पिट्ठू आणि हा लवाजमा घेऊन मी ओल्ड दिल्ली स्टेशनला पोहोचलो. ट्रेन on time असल्याने ठरलेल्या वेळेनुसार 24 December ला सकाळी पाच वाजता मी काठगोदाम ला पोचलो. माझ्या गाडीत बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये तसा नगरचा, पण सध्या पुणेकर असलेला अभिजित हा सेम बॅचला असलेला, को-ट्रेकर भेटला आणि जरा हायसं वाटलं. By then, solo जायची असलेली मनामधली धास्ती काहीशी कमी झाली. 24 ला सकाळी साडेसातला आम्हा बारा जणांचा जत्था ट्रॅव्हलर मधून काठगोदाम ते बेस कॅम्प (लोहाजंग) प्रवास करायला निघाला.  

  

Pic from Kathogodam  to Lohaganj Base Camp

उत्तराखंडचा डोंगरदऱ्या मधील दहा बारा तासांचा दिवसभराचा प्रवास करून आम्ही रात्री आठच्या सुमारास काठगोडामला पोहोचलो (Temp. 8 degree Celsius).तिथे वाहणारे बोचरे वारे हिमालयातल्या बोचऱ्या थंडीची जाणीव करून देत होते. खरं तर हा माझा दुसरा winter trek, reporting time ला वाजणारी थंडी आणि त्या वेळेसची तुमची सहनशीलता ही तुमच्या पुढील ट्रेकची दिशा ठरवते, हा अनुभव गाठीशी असून सुद्धा माझे जे थंडीने बारा वाजले ते पुरेच ! तिथेच मनाशी ठरवलं उद्या जमलं तर ठीक, नाहीतर असेच परत जाऊ स्वतःची सुट्टी व पैसे गेले तरी बेहत्तर ! पण अर्धांगिनीचादोन दिवस थांब आणि मग ठरवू हा सल्ला प्रमाण मानून  मी तात्पुरते उद्या बघू असा ठरवले. 25 ला दुसऱ्या दिवशी, acclimatization walk नंतर थोडा कॉन्फिडन्स तसा मला आला आणि मनाशी ठरवलं की जाऊन तर बघू, नाही जमलं तर डिसेंड होणं आपल्या हातात आहेच की. अगदी गाईडला 'मला थंडी झेपत नाही' हे सांगून 'मला तू खाली आण बाबा' हेही बोलून झालं.

Morning scenes at Base Camp in Lohajung

26 ला तिसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला आम्ही त्या हायर कॅम्प ला प्रयाण केले. Packed lunch आलू पराठा घेऊन आम्ही साडेआठला निघालो. साधारण एकच्या आसपास मधल्या एका lunch पॉईंटला आम्ही जेवण केले. जशी उंची वाढत होती तसा पारा कमी कमी होत होता. जेवणानंतर वाजायला लागली थंडी, हायर कॅम्पला काय वाढून ठेवले आहे याची जाणीव करून देत होती. साधारण चार वाजता आम्ही 1st camp बेकालताल इथे पोचलो. कॅम्प ला रिपोर्ट केल्यावर फ्रेश होऊन साईट seeing करण्याकरता बाहेर पडतो न पडतो तिकडे स्नोफॉल सुरू झाला आणि हलक्याशा हिमवर्षावात आम्ही बेकालताल पाहून सहा वाजेपर्यंत रिटर्न कंपला आलो. ( Temp. -4 degree Celsius)

Higher camps ला light ची सुविधा नसल्यामुळे डिनर हे साडेसहा वाजता होते. असे आम्ही सर्व batch चे 23 जण सातच्या आसपास जेवण करून तंबूत गेलो. हा टेन्ट दोघांचा असल्याने मी आणि माझा तंबू-मित्र अभिजीत आत गप्पा मारत बसलो. बोलता-बोलता नऊच्या आसपास आम्ही झोपी गेलो…

Camp at Bekaltal

Day 4th - 27 ला सकाळी साडेसातला दुसऱ्या higher कॅम्प ला जाण्यासाठी आम्ही निघालो. Higher camp च्या negative  temperature  मध्ये टॉयलेट ला जाणे ही आत्मपरीक्षाच. एवढे असून देखील मी बेकालतालला हे अग्निदिव्य पूर्ण केले. जिरा पराठा हा packed lunch घेऊन आम्ही निघालो. सूर्याची ढगाआड चालू असलेली लपाछपी आणि +/- मध्ये फिरणारा तापमापकातील पारा यासोबत आम्ही मजल दर मजल करत निघालो. बेगम टोक या पॉईंटला लंच करून आम्ही ब्रह्मतल ला जायला निघालो.

Scenes at Begam Tok

हलकासा हिमवर्षाव आणि घसरणारे रस्ते, खाच-खळगे यातून आमची नैया पार होत असावी. साधारण साडेचार च्या आसपास आम्ही ब्रह्मतल ला पोहोचलो आणि इकडे माझा खरा खडतर प्रवास सुरू झाला. चालत असतानाच माझं पोट हे थोडं गुडगुड करत असावे. पण तात्पुरते असावे असे समजून मी तिकडे दुर्लक्ष केले. कॅम्प ला पोचल्यावर एक नाही दोन नाही तब्बल पाच वेळा मी टॉयलेटला गेलो. समुद्रसपाटीवर सुद्धा तीन वेळा जाऊन गारठणारा मी पाच वेळा गेल्यावर काय उरलो असेल हे कोणीही जाणेल. पण बॅच मध्ये असलेल्या विजय सरांनी दिलेल्या dolopar वर मी कसातरी तरलो. थोडासा डाळ भात आणि एक बाटली इलेक्ट्रॉलच्या सहारे माझी निद्रादेवी मला प्रसन्न झाली. -10 degree Celsius च्या तापमानात जिथे रात्री वॉशरूम ला जायला बोबडी वळते तिथे टॉयलेट आली तर काय, या विचारात मला झोप कशी आली हे दैवच जाणे. संपूर्ण रात्र कदाचित देवाला माझं मन हेच सांगत असेल की समिट मिळू दे. आणि ही प्रार्थना देवाने ऐकली.

Frozen Brahmtal Lek

27 ला सकाळी साडेतीन ला चक्क कॅम्पला आम्हाला bed tea मिळाला. Camp lead सरांनी सांगितले होतेच bed tea आला तर summit ला वेदर ओके समजा. तसे bed tea मिळाल्यावर खुश असलेली आमची सगळी बॅच साडेचारला भल्या पहाटे समिट पॉइंटला सनराइज् पाहायला निघालो. अडीच तासाचा प्रवास करून आम्ही सातला सकाळी पोहोचलो. पाहायला मिळालेला अरुणोदय, याकरताच केला तो अट्टाहास या वाक्याची जाणीव करून देत होता. आपण अधिक उंचीवर आणि सूर्य खाली असा मिळणारा एकमेव नजारा हे ब्रह्मतल ट्रेक चे वैशिष्ट्य आणि सर्वांच्या नशिबाने आम्हाला ते मिळाले. समिट पॉईंट नंतर via बेगम टोक आमचा डिसेंड चा प्रवास सुरू झाला. दुपारी तीन वाजता आम्ही बेगम टोक या पॉईंटला पोचलो. तिकडे पोहोचताना स्वच्छ आकाश आणि न वाजणारी थंडी आम्ही ट्रेक पूर्ण केला ही जाणीव करून देत होती. परंतु ही भावना केवळ काही तासांपूरतीच असावी. साधारण पाच वाजेपासून पुन्हा हाडे गोठवणारी थंडी सुरू झालीच तर..

                                                             

Me 😍  at Summit Point 

Summit पूर्ण झाल्यानंतर ग्रुप BT 8 ने आज 28 डिसेंबर ला कॅम्प फायर करायचे ठरवले होते पण साडेसहाला जेवण झाल्यानंतर जसे सर्व काही स्लिपिंग बॅगमध्ये असे पळाले ते कोणी बाहेर आलेच नाहीत.

29 डिसेंबर - आता trek संपला अशा काहीशा थोड्या उदास अंतकरणाने आम्ही उठलो असू, पण चहासाठी बाहेर येतो तर काय, साधारण 3 feet snowfall झाला असावा. काल आलेला कॅम्प हाच आहे का हा प्रश्न पडावा. संपूर्ण झाडे जमीन यांनी जणू काही पांढरीशुभ्र दुलई पांघरली, असा भास जणू. कुठल्याही हॉलीवूडच्या चित्रपटांना लाजवेल असा scene.

   

Snowfall at last camp

अगदी नशिबाने तेव्हा व्हिडिओ कॉल करण्याइतके नेटवर्क येऊ लागले होते. सर्व आप्तस्वकीयांना व्हिडिओ कॉल करून हिमालयाचा तो नयनरम्य नजरा दाखवला आणि मजल दरमजल करत बारा एक च्या सुमारास आम्ही लोहाजंगच्या बेस कॅम्पला पोहोचलो. अतिशय मस्त अशा मराठी कॅम्प लीडर पुण्याचे श्री आशिष टप्पे यांना टाटा करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

 

जेवण वगैरे करून तिकडेच जवळच्या एका लाटु देवता (पार्वतीचा भाऊ) या मंदिरात गेलो. उत्तराखंड गव्हर्मेंट याला कदाचित पाचव्या धामाचा दर्जा देणार आहे असे आम्हास लोकल गाईडने सांगितले.

Latu Devata Temple

दर्शन करून येताना, गाडी कुठेतरी चहा ला थांबली, तिकडे मस्त चार हजार फुटांवर तिथल्या तरुणांसोबत आम्ही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रात्रीच्या certificate distribution ceremony ने आजच्या दिवसाचा शेवट झाला.

30 डिसेंबर - सकाळी सात वाजता पुन्हा एकदा हिमालयाचे दोन्ही हातांनी दंडवत करून दर्शन घेतले आणि पुन्हा लवकर बोलावून या प्रार्थनेने, जड मनाने, आमच्या बेस कॅम्प चा मी निरोप घेतला. येणारा मी आणि आज पुन्हा जायला निघालेला मी यामध्ये केवळ एक तो फरक होता - मनावरचा संयम, थंडी सहन करायची शक्ती आणि जगाच्या पाठीवर कुठेही एकट्याने राहायची क्षमता. अर्थात या सर्वांमागे माझे आई-बाबा, माझ्या सुरक्षित परतण्यासाठी, माझ्या चांगल्या तब्येतीसाठी कायम देवाची प्रार्थना करणारी माझी बच्चूआजी यांचाही खूप मोठा वाटा आहे. लिखाणाचा शेवट करताना तुम्हा सर्व वाचकांना सुद्धा एकदा तरी आयुष्यात हिमालय ट्रेकचा experience मिळावा हीच त्या हिमालयाकडे प्रार्थना.

संपवताना 'नमो नमो जी शंकरा' या माझ्या लाडक्या गाण्याच्या दोन ओळी हिमालया करिता -

                        अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा |

                       तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा ||

   

          By: Pranav(91566 74505/758811 0705)

       (pranavchavare @ gmail,com)













Comments

Post a Comment